पुणे : मध्यरात्रीनंतर मुलींना अभ्यासासाठी लायब्ररीत येता येणार नाही, असा फतवा पुण्यातील बेहरामजी जीजीभाई मेडीकल कॉलेजने काढला आहे. परीक्षा तोंडावर असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थींनींनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.
विद्यार्थ्यांना लायब्रेरीत रात्रभर अभ्यासासाठी परवानगी आहे. मात्र कॉलेजचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी नुकताच याबाबत आदेश जारी केला आहे.
विद्यार्थीनींना रात्री सव्वा अकरा वाजताच लायब्ररीतून बाहेर काढलं जात. त्यानंतर पुन्हा प्रवेश दिला जात नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सक्षम अहवालाच्या नियमानुसार कुठल्याही कॉलेजमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी असे स्वतंत्र नियम असू शकत नाहीत, असं विद्यार्थीनींनी म्हटलं आहे.
विद्यार्थीनींचं होस्टेल आणि लायब्रेरी यांच्यात जवळपास एक किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे लवकर रुमवर पोहचणं सुरक्षेसाठी चांगलं असल्याचं मत एका स्थानिक महिला डॉक्टरने व्यक्त केलं.
दरम्यान अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. अनेक विद्यार्थीनी अभ्यासाला रात्री दीडनंतर लायब्रेरीत येतात, असं आढळून आलं. हे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अयोग्य आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असा निर्णय घेण्यात येईल, असं चंदनवाले यांनी सांगितलं.