रिओ दी जेनेरिओ: भारताचे क्रीडामंत्री विजय गोयल यांच्यासोबत घोळक्यानं फिरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अरेरावीला कंटाळून, रिओ ऑलिम्पिकच्या आयोजन समितीनं गोयल यांचं अधिस्वीकृती कार्ड रद्द करण्याची धमकी दिली आहे. रिओ ऑलिम्पिक आयोजन समितीच्या कॉन्टिनेन्टल मॅनेजर सारा पीटरसन यांनी भारतीय पथकाचे प्रमुख राकेश गुप्ता यांना पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली.
ऑलिम्पिक स्टेडियम्समधल्या प्रतिबंधित परिसरात केवळ अधिस्वीकृतीधारकांना प्रवेश असूनही, तुमचे क्रीडामंत्री त्यांच्यासोबत घोळक्यानं फिरणाऱ्या व्यक्तींनाही तिथं घुसवण्याचा प्रयत्न करतात. यासंबंधीच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्याची माहिती पीटरसन यांनी पत्रात दिली आहे. तिथल्या स्वयंसेवकांनी गोयल यांच्यासमवेतच्या घोळक्याला अटकाव केला तर ही मंडळी अरेरावी करायला लागतात. कधी कधी तर ऑलिम्पिकच्या स्वयंसेवकांना धक्काबुक्की करतात अशी तक्रारही पीटरसन यांनी नोंदवली आहे.
हे प्रकार तातडीनं थांबले नाहीत, तर तुमचे क्रीडामंत्री विजय गोयल यांची अधिस्वीकृती आम्ही रद्द करू अशी धमकी सारा पीटरसन यांनी आपल्या पत्रातून दिली आहे.