रिओ ऑलिम्पिक : गगन नारंगची अंतिम फेरी 1.8 गुणांनी हुकली
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2016 04:48 PM (IST)
रिओ दि जनैरो : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची पाटी अजूनही कोरीच आहे. भारताच्या गगन नारंग आणि चैन सिंगचं 50 मीटर्स रायफल प्रोन प्रकारातलं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. गगन नारंगचं अंतिम फेरीचं तिकीट अवघ्या 1.8 गुणांनी हुकलं. ऑलिम्पिकमध्ये पदकांची सर्वात मोठी अपेक्षा असलेल्या नेमबाजांनी सातव्या दिवशीही सपशेल निराशा केली. गगन नारंगला 623.1 गुणांसह सत्तेचाळीस नेमबाजांमध्ये तेराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यात आठव्या स्थानावरच्या हेन्री जुन्गहॅनेलनं 624.8 गुणांची नोंद केली. म्हणजेच गगन नारंगचं अंतिम फेरीचं तिकीट अवघ्या 1.8 गुणांनी हुकलं. चैन सिंग 619.6 गुणांसह 36 व्या स्थानावर आला. या प्रकारात पहिल्या आठ नेमबाजांना अंतिम फेरीचं तिकीट मिळालं.