रिओ दि जनैरो : ऑलिम्पिक मोहिमेसाठी भारताचा पैलवान नरसिंग यादव रिओमध्ये दाखल झाला आहे. भारतीय कुस्तीचे मुख्य प्रशिक्षक जगमिंदर सिंग यांच्यासह नरसिंग यादव आज ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पोहोचला.

 
गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांबद्दल मला विचारु नका, मला त्या गोष्टींचा आता विचारही करायचा नाही, असं नरसिंग यादवने यावेळी सांगितलं. 'माझ्यासमोर आता केवळ भारतासाठी पदक जिंकायचं हेच एक लक्ष्य आहे,' असंही नरसिंगनं यावेळी म्हटलं.

 
ऑलिम्पिकमध्ये नरसिंग यादवचा पहिला सामना 19 ऑगस्टला खेळवला जाईल. रिओ ऑलिम्पिकआधीच नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला होता. मात्र नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं नरसिंग क्लीन चीट दिली.

 
नरसिंगनं जाणूनबुजून डोपिंग केलं नसल्याचा त्याचा दावा नाडाच्या शिस्तपालन समितीनं मान्य केला. त्यामुळे नरसिंगला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली.