ऑलिम्पिकमध्ये बोल्टनं रचला इतिहास, 200 मी. शर्यतीत सुवर्णपदक
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2016 03:04 AM (IST)
जमैका: जमैकन धावपटून उसेन बोल्टनं आपणच वेगाचा बादशाह असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. बोल्टनं सलग तिसऱ्यांदा 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. बोल्टनं 19.78 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. बोल्टचं यंदाचं दुसरं, तर ऑलिम्पिकमधलं हे आजवरचं आठवं सुवर्णपदक ठरलं. बोल्टनं याआधी 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं आहे. 2008 साली बीजिंगमध्ये आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर्स, 200 मीटर्स आणि फोर बाय हंड्रेड मीटर्स रिलेमध्ये सुवर्णपदकं मिळवली होती. बोल्ट आता रिओमध्येही 100 आणि 200 मीटरपाठोपाठ फोर बाय हंड्रेड मीटर रिलेतही सुवर्णपदकासाठी प्रयत्न करणार आहे.