रिओ दी जेनेरिओ: भारताचा पैलवान नरसिंग यादवचं रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न अखेर भंगलं आहे. कारण क्रीडा लवादानं नरसिंग यादववर चार वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळं नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही.


 

उत्तेजक सेवनप्रकरणी नरसिंगला नॅशलन अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं क्लीनचिट दिली होती. पण नाडाच्या या निर्णयाचा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडानं विरोध केला. वाडानं नाडाच्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं होतं. अखेर चार तासांच्या चर्चेनंतर क्रीडा लवादानं नरसिंगला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली.

 

25 जून आणि 5 जुलै रोजी झालेल्या तपासणीत नरसिंगच्या नमुन्यांत मेटँडिएनोन या स्टेरॉईडचा अंश आढळून आला होता. नरसिंगनं मात्र त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाडानं नरसिंग यादवला क्लीनचिट दिली होती. पण आपल्याविरोधात कट रचल्याचं नरसिंग यादव क्रीडा लवादासमोर सिद्ध करु शकला नाही. त्यामुळं नरसिंग यावर बंदीची कारवाई करण्यात आली.