मुंबई : व्यायसायिक विशाल कारियाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. क्रिकेटप्रेमी गणेश मधुकर पवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. गणेश पवार यांच्यातर्फे वकील अमर भट्ट यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

विशाल कारिया हा मुंबईतील व्यावसायिक असून, त्याचे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी तसंच फिरकीपटू हरभजन सिंह यांच्यासह अनेक
क्रिकेटपटूंशी जवळचे संबंध आहेत.

"विशाल आणि त्याचा दुबईतील साथीदार हितेश संघवी हे दोघेही मॅचफिक्सिंगच्या व्यवसायात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यामुळे या दोघांनी भारतीय संघातील क्रिकेटपटूंवर कोट्यवधी रुपयांची खैरात करुन काही सामन्यांत मॅचफिक्सिंग केल्याचा संशय आहे. त्यामुळेच त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा," अशी मागणी गणेश पवार यांनी केली आहे.



सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचा ‘हा’ मेसेज व्हायरल!

"विशाल कारिया आणि भारतीय क्रिकेटपटूंमधील मैत्री ही फक्त व्यवसायापुरती मर्यादित नाही. त्यात अनेक लागेसंबंध असल्याची माहिती फक्त मोजक्या जणांनाच आहे. विशाल कारिया आणि त्याचे साथीदार मॅचफिक्सिंगसारखे गैरप्रकार करुन करोडो चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे विशालसारख्या बुकीला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही," असं गणेश पवार यांनी याचिकेत म्हटलं आहे.

कोण आहे विशाल कारिया?



विशाल कारिया मुंबईतला व्यावसायिक असून, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हरजभजन सिंग यांसारख्या खेळाडूंशी त्याची मैत्री आहे. मुंबईसह अनेक प्रमुख शहरांमध्ये त्याची मालमत्ता आहे. विशाल आणि दुबईत स्थायिक असलेला त्याचा साथीदार हितेश संघवी हे दोघेही मॅच फिक्सिंगच्या व्यवसायात यापूर्वीपासून आहेत, असं व्हायरल मेसेजमध्ये म्हटलंय. आपल्या आरामदायी आयुष्यासाठी नावाजलेल्या या दोघांचे अनेक राजकारण्यांशी चांगले संबंध देखील आहेत आणि सर्वांना त्यांच्या मॅच फिक्सिंगसाठी लागणाऱ्या कौशल्याची चांगली जाण आहे, असेही यात म्हटलं आहे.