बंगळुरु : ऋषभ पंतच्या कठोर संघर्षानंतरही बंगळुरूतल्या आयपीएल सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. शेन वॉटसनच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 15 धावांनी पराभव करून यंदाच्या मोसमातला आपला पहिला विजय साजरा केला.
केदार जाधव बंगळुरुच्या या विजयाचा शिल्पकार खरा शिल्पकार ठरला. त्याने 37 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 69 धावांची खेळी करून बंगळुरुला 20 षटकांत आठ बाद 157 धावांची मजल मारून दिली होती.
ऋषभ पंतने 36 चेंडूंत 57 धावांची खेळी करून त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची हिंमत दाखवली. पण अखेरच्या षटकात पवन नेगीने पंतचा त्रिफळा उडवला आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव निश्चित झाला.
बंगळुरुकडून बिली स्टेनलेक, इकबाल अब्दुल्ला आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर शेन वॅट्सन, टायमल मिल्स आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.
बंगळुरुचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला या सामन्यातही खास कामगिरी बजावती आली नाही. केवळ 6 धावा करुन तो माघारी परतला.
दिल्लीकडून कर्णधार जहीर खानने 2, ख्रिस मॉरिसने 3, तर पॅट कमिन्स आणि शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.