कोच्ची : सुप्रीम कोर्टानं हायवे लगतच्या दारु विक्रीवर बंदी घातल्यापासून अनेक राज्यात विविध पळवाटा काढल्या जात आहेत. यातीलच एक प्रकार केरळमधून समोर आला आहे. केरळच्या उत्तरी पुरावरीमध्ये राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका दारु विक्रेत्याने चक्क दुकानाच्या बाजूने भिंत घालून पाचशे मीटरचं अंतर तयार केलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 1 एप्रिल रोजी उत्तरी पुरावरीच्या राष्टीय महामार्गावरचा ऐश्वर्या बार बंद करण्यात आला. यानंतर दारु विक्रेत्याने अनोखी शक्कल लढवून बारच्या बाजूने भिंत बांधून 500 मीटरचं अंतर तयार केलं.

विशेष म्हणजे, राज्यातील आबकारी विभागानेही दारु विक्रेत्याच्या या पळवाटेला मान्यता दिली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवत, या दारु विक्रेत्याने पुन्हा बिनधोकपणे दारु विक्री सुरु केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गासोबतच राज्य महामार्गावरील दारु विक्रीची दुकानं, बार बंद करण्यात येत आहेत. याशिवाय या निर्णयानंतर हायवे लगतच्या हॉटेल-रेस्टारंटमधूनही दारु विक्री बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक मद्यविक्रेत्यांची पंचाईत झाली होती.

यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्रातील मद्यविक्रेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राज्य सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. हॉटेल मालकांची संघटना असलेल्या ‘आहार’नं ही मागणी उचलून धरली होती.

पण त्यातच केरळमधील ऐश्वर्या बारच्या मालकानं ही अनोखी शक्कल लढवत सुप्रीम कोर्टाच्या आदेशातून पळवाट काढली आहे. त्याला केरळच्या महसूल विभागाकडूनही मान्यता मिळतानाचे चित्र आहे.