नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर बालेकिल्ला आहे. मात्र आज नितीन गडकरींना चक्क मुख्यमंत्र्यांच्या देखत नागपूर महापालिकेच्या दिरंगाई कारभाराची तक्रार करावी लागली. ते नागपूर महापालिकेनं आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी शिखर परिषदेत बोलत होते.


नितीन गडकरींचं घर जुन्या नागपुरात आहेत. त्यांच्या घरासमोरचे रस्ते अरुंद असून, तिथं बाजार भरतो. त्यामुळं महापालिकेनं घरासमोरचे रस्ते रुंद करावे आणि तिथं भरणाऱ्या बाजारावर तोडगा शोधावा अशी मिश्किल तक्रार नितीन गडकरींनी केली. त्याचप्रमाणे महापालिका जुन्या नागपूरच्या तुलनेत नव्या नागपूरकडे जास्त लक्ष देते, अशी कोपरखळी देखील गडकरींना मारली.

नितीन गडकरी यांनी या आधी ही अनेकवेळा महानगरपालिकेला त्याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आज गडकरी यांनी मिश्किलपणे सार्वजनिक मंचावरुन महानगरपालिकेच्या कारभारावर टीका केली.

तसेच जुन्या नागपुराच्या तुलनेत नव्या नागपुरात जास्त विकास कार्य झाल्याचा पुनर्रुच्चार गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांदेखत केला. संपूर्ण नागपूर स्मार्ट बनेल आणि माझेच परिसर मागे राहिले, तर ते योग्य दिसणार नाही अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी लगावली.

दरम्यान, स्मार्ट सिटी योजना श्रीमंतांसाठी नाही तर गरिबांसाठीही आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी स्मार्ट सिटी योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.