अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाचं लग्न पुन्हा एकदा चर्चेत आहे. आधी लग्नाच्या वरातीत गोळीबारामुळे तो चर्चेत होता. आता जाडेजाला एका कंपनीने 6 लाखांचा चुना लावला आहे.


 

रवींद्र जाडेजाचं लग्न 17 एप्रिल रोजी झालं होतं. या शाही विवाहसोहळ्यासाठी अहमदाबादच्या अॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत 11 लाख रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. पण कंपनीचे मॅनेज श्याम त्रिवेदी, केवल पटेल आणि उर्वी बावरिया यांनी ठरवल्याप्रमाणे काम न केल्याने, रवींद्रच्या बहिणीने हे काम दुसऱ्या कंपनीला दिलं.

 

पण लग्न होऊन चार महिने उलटल्यानंतरही अहमदाबादच्या कंपनीकडून 6 लाख रुपये परत मिळाले नाहीत. त्यामुळे त्याच्या बहिणीने अॅब्सॉल्ट इव्हेंट कंपनीच्या तिघांविरोधात तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

 

बहिण नयनाबा जाडेजाने सांगितलं की, "रवींद्रचं लग्न 17 एप्रिल रोजी झालं होतं. लग्नाच्या व्हिडीओग्राफीसह सर्व कार्यक्रमांसाठी अॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला 11 लाख रुपयांमध्ये कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. यासाठी कंपनीला 6 लाख रुपये अॅडव्हान्सही दिले होते. पण कंपनीने ठरवल्यानुसार काम केलं नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या कंपनीला हे काम देण्यात आलं. लग्नाला चार महिने उलटल्यानंतरही कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिला आहे. जे करायचंय ते करा, पण आम्ही पैसे परत देणार नाही, अशी धमकीही देत आहे."