जाडेजाला परिपूर्ण खेळाडू न मानत संजय मांजरेकरने त्याच्याऐवजी पूर्णवेळ गोलंदाज किंवा पूर्णवेळ फलंदाजाला संघात सामील करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर जाडेजाने ट्वीट करत संजय मांजरेकरला खेळाडूंचा सन्मान राखण्याविषयी सांगितलं होतं.
'चहल आणि कुलदीप यांच्या खराब कामगिरीनंतरही टीममध्ये रवींद्र जाडेजाला सहभागी करावं का?' असा प्रश्न मांजरेकरला विचारण्यात आला होता. 'मी अनियमित खेळाडूंचं समर्थन करत नाही. जाडेजा सध्या वनडे कारकीर्दीत अनियमितपणे खेळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो चांगली गोलंदाजी करतो, मात्र वनडेमध्ये मी त्याच्या जागी एखादा फलंदाज किंवा गोलंदाज निवडेन' असं उत्तर मांजरेकरने दिलं होतं.
त्यानंतर रवींद्र जाडेजाने ट्वीट करत संजय मांजरेकरला खेळाडूंचा सन्मान राखण्यास सांगितलं. 'मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे आणि मी अजूनही खेळतो. ज्यांनी एखादी गोष्ट साध्य केली आहे, त्यांचा मान राखायला हवा. मी तुमच्या तोंडाळपणाविषयी बरंच काही ऐकलं आहे' अशी तिरकस टीका जाडेजाने केली होती.
Still i have played twice the number of matches you have played and i m still playing. Learn to respect ppl who have achieved.i have heard enough of your verbal diarrhoea.@sanjaymanjrekar
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 3, 2019
या वादात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही उडी घेतली होती. मात्र वॉनने नाक खुपसल्याचं मांजरेकरला न रुचल्यामुळे कदाचित त्याने वॉनला ट्विटरवर ब्लॉक केलं. 'ब्रेकिंग न्यूज! संजय मांजरेकरने मला ब्लॉक केलं आहे' असं ट्वीट वॉनने स्क्रीनशॉट शेअर केला होता.
विश्वचषकाच्या साखळी फेरीत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या भारताच्या अंतिम सामन्यात रवींद्र जाडेजाला संघात स्थान मिळालं. त्यानंतर मांजरेकरने आपला विचार बदलत जाडेजाला चतुर खेळाडू म्हटलं होतं. उपान्त्य फेरीत भारताचा पराभव झाला असला, तरीही मांजरेकरने भारताचं कौतुकच केलं.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपान्त्य फेरीत रवींद्र जाडेजाच्या ऐतिहासिक आणि धोनीच्या साहसी खेळीनंतरही भारतीय सलामीवीरांच्या सुमार कामगिरीमुळे टीम इंडियाचं विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
कोहलीनेही रवींद्र जाडेजाचं तोंडभरुन कौतुक केलं. 'जाडेजाने दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी बजावली. त्याची खेळी संघासाठी सकारात्मक ठरली.' असं कोहली म्हणाला. चार चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी जाडेजाने या सामन्यात केली.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये काल (बुधवारी) उपान्त्य सामन्याला सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे काल न्यूझीलंड 46.1 षटकांत पाच बाद 211 धावांवर खेळत असताना सामना थांबवण्यात आला. उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी सुरु झाला, तेव्हा न्यूझीलंडने आणखी तीन विकेट गमावत 50 षटकात 239 धावांपर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगलीच अडखळत झाली. हेन्री आणि बोल्ट यांनी भारताच्या सलामीवीरांची जोडी फोडल्यामुळे संघाची चांगलीच दाणादाण उडाली. के एल राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली हे तिघेही प्रत्येकी एक धाव करुन तंबूत परतल्यामुळे तीन षटकांनंतर भारताची अवस्था तीन बाद पाच अशी केविलवाणी झाली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सलामीचे तिन्ही फलंदाज अवघी एक धाव करुन पॅव्हिलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सहा धाव करुन दिनेश कार्तिकही माघारी गेल्यामुळे दहा षटकांच्या अखेरीस भारताची स्थिती चार बाद 24 अशी झाली होती. रवींद्र जाडेजाने 59 चेंडूंमध्ये केलेल्या 77 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला पराभवाची दरी कमी करता आली.
रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या होत्या. मात्र मार्टिन गप्टिलने धोनीला रनआऊट करत भारताच्या उरल्यासुरल्या अपेक्षांच्या ठिकऱ्या उडवल्या.