'सामन्याचा पूर्वार्ध आमच्यासाठी चांगला होता. आम्ही खूप चांगले खेळलो. आम्हाला जे करायचं होतं, ते आम्ही केलं. पाठलाग करता येईल, अशा धावसंख्येवर आम्ही न्यूझीलंडला रोखलं. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, त्यामुळे सामन्यावर फरक पडला' असं कोहली पराभवानंतर म्हणाला.
कोहलीने रवींद्र जाडेजाचं तोंडभरुन कौतुक केलं. 'जाडेजाने दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी बजावली. त्याची खेळी संघासाठी सकारात्मक ठरली. एक गोष्ट मान्य करणं कितीही कठीण असलं, तरी न्यूझीलंडचा संघ विजय डिझर्व्ह करतो. त्यांनी आम्हाला सतत दबावाखाली ठेवलं' असं कोहली म्हणाला.
फलंदाजांचं शॉट सिलेक्शन वाईट होतं. त्यामुळे पराभव चाखावा लागला. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. मात्र नॉकआऊटमध्ये न्यूझीलंड संघ साहसाने क्रिकेट खेळला, असं मत कोहलीने व्यक्त केलं. सामन्यानंतर कोहलीने चाहत्यांचेही आभार मानले.
विश्वचषकाच्या पहिल्या उपान्त्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत मजल मारली. रोहित शर्मा, के एल राहुल या सलामीवीरांसोबतच कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारताच्या फायनलचं तिकीट मिळवण्याच्या आशा धूसर झाल्या होत्या.
पहिल्या दहा षटकांमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावे जमा झाला आहे. सुरुवातीच्या 10 षटकांमध्ये 27 धावा करण्याचा न्यूझीलंडचा विक्रम टीम इंडियाने मागे टाकला. भारताने पहिला पॉवरप्ले समाप्त होईपर्यंत चार गडी गमावून 24 धावा केल्या होत्या.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये काल (बुधवारी) उपान्त्य सामन्याला सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे काल न्यूझीलंड 46.1 षटकांत पाच बाद 211 धावांवर खेळत असताना सामना थांबवण्यात आला. उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी सुरु झाला, तेव्हा न्यूझीलंडने आणखी तीन विकेट गमावत 50 षटकात 239 धावांपर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगलीच अडखळत झाली. हेन्री आणि बोल्ट यांनी भारताच्या सलामीवीरांची जोडी फोडल्यामुळे संघाची चांगलीच दाणादाण उडाली. राहुल, रोहित आणि विराट हे तिघेही प्रत्येकी एक धाव करुन तंबूत परतल्यामुळे तीन षटकांनंतर भारताची अवस्था तीन बाद पाच अशी केविलवाणी झाली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सलामीचे तिन्ही फलंदाज अवघी एक धाव करुन पॅव्हिलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सहा धाव करुन दिनेश कार्तिकही माघारी गेल्यामुळे दहा षटकांच्या अखेरीस भारताची स्थिती चार बाद 24 अशी झाली होती.
रवींद्र जाडेजाने 77 धावा आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या होत्या. मात्र मार्टिन गप्टिलने धोनीला रनआऊट करत भारताच्या उरल्यासुरल्या अपेक्षांच्या ठिकऱ्या उडवल्या.
न्यूझीलंडने विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे, तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. साखळी फेरीत नऊपैकी सात सामने जिंकत, 15 गुण मिळवून अव्वल ठरत भारताने उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली होती. मात्र उपान्त्य फेरीतच विश्वचषकातून बाहेर पडण्याची वेळ भारतावर आली.