मुंबई: टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जाडेजानं आपलं नवं मोबाइल अॅप लाँच केलं आहे. जाडेजानं हे अॅप न्यूयॉर्कच्या एका टेक कंपनीकडून तयार करुन घेतलं आहे. या अॅपच्या मदतीनं जाडेजा आपल्या चाहत्यांशी जोडला जाणार आहे.


मैदानाबाहेरील मजा-मस्ती आणि अनुभव तो आपल्या चाहत्यांशी शेअर करणार आहे. जाडेजानं स्वत: ट्विटरवरुन याची माहिती दिली असून आपल्या चाहत्यांना अॅप डाऊनलोड करण्याचं आवाहन केलं आहे. 'या अॅपसाठी मी खूपच उत्सुक आहे. या अॅपमुळे मी थेट तुमच्याशी जोडला जाणार आहे. माझ्याबाबत तुम्हाला अधिक माहितीही मिळू शकेल.' असं जाडेजा म्हणाला.

जाडेजा हा भारतीय संघातील पहिला खेळाडू आहे की ज्यानं आपलं स्वत:चं अॅप लाँच केलं आहे. एवढंच नाही तर आपल्या युनिक स्टाईलसाठी जाडेजा ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या या अॅप कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.