नवी दिल्ली : टॉम मूडी, वीरेंद्र सेहवाग, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, फिल सिमंस आणि रवी शास्त्री, या सर्व दिग्गजांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.


मुख्य प्रशिक्षकपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु असतानाच लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे. टीम इंडियासोबत विविध भूमिकेत राहिलेले रवी शास्त्रीच टीम इंडियाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील, असं मत सुनील गावसकर यांनी मांडलं आहे.

रवी शास्त्री तो माणूस आहे, ज्याने 2014 साली टीम इंडियाच्या कायापालटाची सुरुवात केली होती, असंही सनील गावसकर म्हणाले. 2014 ते 2016 या काळात रवी शास्त्री टीम इंडियाचे संचालक होते. विशेष म्हणजे त्यांचे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशीही चांगले संबंध आहेत. अनेक वृत्तांनुसार रवी शास्त्रीच प्रशिक्षक असावेत, असं संघातील अनेक खेळाडूंचं म्हणणं आहे.

इंग्लंडमध्ये 2014 साली भारताला दारुण पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा बीसीसीआयने रवी शास्त्रींची संचालक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर संघाचा कायापालट झाला. त्यामुळे आता औपचारिकपणे रवी शास्त्रींनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे, तर ते प्रशिक्षक होऊ शकतात, असं सुनील गावसकर म्हणाले.

बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवल्यानंतर रवी शास्त्रींनी अर्ज केला होता.