चेन्नई: त्रिशतक ठोकणारा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज करुण नायरवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सर्व माहोलमधून बाहेर येण्यासाठी मला खरंच काही वेळ लागेल. असं करुणनं प्रांजळपणे मान्य केलं.


चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत करुण म्हणाला की, 'त्रिशतकानंतर अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या. ड्रेसिंग रुममधील वातावरण तर नेहमीच चांगलं असतं. त्यामुळे मी जे काही केलं त्याचं सर्वच खेळाडूंनी कौतुक केलं.'

याचवेळी करुणला त्याच्या त्रिशतकाबाबत विचारण्यात आलं. 'तू त्रिशतकाविषयी कधी विचार सुरु केलास?' यावर करुण म्हणाला की, '280 धावा झाल्यानंतर माझा साथीदार रविंद्र जाडेजानं मला याची जाणीव करुन दिली. त्रिशतक करेन असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण माझ्या 250 धावा झाल्यानंतर संघ व्यवस्थापनानं काही योजना आखली असणार. त्याच पाच षटकांमध्ये मी 280 ते 285 धावांपर्यंत पोहचलो. याचवेळी मलाही जाणवू लागलं की, मी त्रिशतक करु शकतो. तेव्हा जड्डू मला सतत म्हणत की, तू ही संधी सोडू नकोस, 300 रन आरामात पूर्ण करु शकतो.' असं करुण म्हणाला.

'99, 199 आणि 299 धावांवर असताना मी खरंच नर्व्हस होतो. पण त्यावेळी तुम्ही नकारात्मक विचार करु शकत नाहीत. तुम्हाला फक्त खेळायचं असतं. त्यावेळी फक्त चेंडू पाहणं ऐवढच तुमचं काम असतं.' असंही करुण म्हणाला.