मुंबई: अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाला स्थानिक मच्छिमारांनी विरोध केला आहे. 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या भूमीपूजनावेळी तीव्र आंदोलन केलं जाणार असा इशारा यावेळी मच्छिमार संघटनेनं दिला आहे.

शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला विरोध करण्यासाठी आज जाहीर सभा घेण्यात आली आहे. वारंवार निवेदनं देऊन सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढच्या पाच दिवसात मागण्यांची दखल घेतली नाही तर भूमीपूजन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात शिवस्मारक होणार आहे. त्यामुळे मासेमारी करणं कठीण होईल असं मच्छिमारांचं म्हणणं आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबरला पंतप्रधान मोदी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे जोरदार कार्यक्रमांचा धडाका मुंबईत रंगणार आहे. मोदींच्या हस्ते तब्बल 8 प्रकल्पांचं भूमीपूजन होणार आहे. शिवस्मारकच्या भूमीपूजनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

शिवस्मारक भूमीपूजनसाठी 70पेक्षा जास्त किल्ल्यांवरील माती आणि नदीचं पाणी आणलं जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि संबंधित भागातील आमदार ही माती आणि पाणी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील. त्यासाठी २३ डिसेंबरला गेट वे ऑफ इंडियावर राज्य सरकारतर्फे जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

२४ डिसेंबराला शिवाजी महाराजाचे वंशज साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभीजीराजे यांच्यातर्फे शिवस्मारकाचे भूमीपूजन प्रत्यक्ष समुद्रातील खडकावर केलं जाईल.