तणावामुळे शाळा लवकर सुटली, पण मुलगी घरी परतलीच नाही!
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2018 02:50 PM (IST)
खरंतर कालच्या घटनेमुळे मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आलं होतं.
श्रीरामपूर : भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर राज्यात अस्थिर झालेल्या परिस्थितीचा फटका श्रीरामपूर तालुक्यातील आदिक कुटुबियांना बसला आहे. अमोल आदिक यांची आठ वर्षीय मुलगी श्रद्धा स्कूल बसने शाळेतून सोडल्यानंतर अद्यापही घरी परतली नसून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सकाळी श्रीरामपूर शहरातील परिस्थिती तणावपूर्ण होत असताना अनेक शाळांनी आपल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूलची रोज साडेचार वाजता सुटणारी शाळा लवकर सोडण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने पालकांना मुलांना घरी स्कूल बसने लवकर सोडत असल्याचे फोनवरुन कळवले होते. शाळेने आपले काम पूर्ण केले खरे, मात्र रोजप्रमाणे आठ वर्षीय तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या श्रद्धाला स्कूल बसने खानापूर स्टॉपवर सोडले. मात्र त्यानंतरही मुलगी अद्यापही घरी पोहचली नसून, आदिक कुटुंबीय मुलीचा शोध घेत आहेत. रोज स्टॉपवर सोडल्यावर मुलगी घरी एकटीच येते. मात्र काल घरी न परतल्याने मुलीचा घातपात झाला की अपहरण याबाबत पोलिसांनी शोध घेण्याची मागणी कुटुबियांनी केली आहे. दरम्यान, तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिचं अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ह्या मुलीला पाहिल्यास पोलिस आणि तिच्या पालकांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कु. श्रद्धा अमोल आदिक खानापूर येथील वय 8 वर्ष आहे. ती शाळेतून घरी न येता 2:45 वाजल्यापासून हरवली आहे. तरी ती दिसल्यास कृपया संपर्क प्रशांत आदिक -7972504144, 9552891270