मुंबई: अनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. पण अजूनही भारतीय क्रिकेट टीम मॅनेजमेंटमधील वाद काही संपलेला नाही. बीसीसीआयच्या अंतिम घोषणेनंतरही काही नव्या घडामोडी घडू शकतात. सुत्रांच्या माहितीनुसार, माजी गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण हे टीम इंडियासोबत दिसू शकतात.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण हवे आहेत. तशी घोषणाही होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास जहीर खान हा फक्त परदेश दौऱ्यावरच टीम इंडियासोबत असेल. कारण की, गोलंदाजी सल्लागार म्हणून बीसीसीआयनं जहीरची निवड केली आहे.
भरत अरुण
रवी शास्त्री आणि भरत अरुण हे 1980 पासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एन. श्रीनिवासन यांच्या कार्यकाळात रवी शास्त्री यांच्या मागणीनुसारच भरत अरुण यांची एनसीएमधून थेट भारतीय संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. दुसरीकडे जहीर आणि बीसीसीआयमध्ये अजूनही कराराबाबत चर्चा सुरु आहे.
दरम्यान, क्रिकेट सल्लागार समितीतील सदस्य सौरव गांगुलीला असं वाटतं की, जहीरनं संपूर्ण वेळ भारतीय संघासाठी द्यावा. त्यामुळेच जहीरची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण या नियुक्तीच्या एका दिवसानंतरच अशी बातमी समोर आली की, रवी शास्त्री यांना त्यांच्या आवडीचा सपोर्ट स्टाफ मिळालेला नसल्यानं ते नाखूश आहेत आणि भरत अरुण हे त्यांच्या मर्जीतले आहेत.
झहीर खान
या संपूर्ण प्रक्रियेत सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यामध्ये असलेलं शीतयुद्धही सध्या पाहायला मिळत आहे. कारण की, मागील वर्षी जेव्हा कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती त्याचवेळी रवी शास्त्रीच्या नावाला सौरवनं नकार दिला होता. पण आता मात्र शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणी 15 जुलैला सीओएची एक बैठक होऊ शकते. ज्यामध्ये सपोर्ट स्टाफबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या:
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री, झहीर खान गोलंदाजी सल्लागार
परदेश दौऱ्यात टीम इंडियाला 'द वॉल'चं मार्गदर्शन!