अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालं. यावेळी कोपर्डीतल्या पीडितेच्या घरासमोर तिचं स्मारक बांधण्यात आलं आहे. हे पीडितेचं स्मारक नसून समाधी आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी दिली.


भय्यूजी महाराज यांचा सूर्योदय परिवार आणि पीडितेच्या कुटुंबाकडून या स्मारकाची उभारणी करण्यात आली.
राज्यभरातून हजारो नागरिक यावेळी कोपर्डीत उपस्थित होते. पीडितेच्या कुटुंबीयांनाही इथं आणण्यात आलं. स्मारकाजवळ येताच पीडितेच्या आईचा बांध फुटला आणि तिनं एकच आक्रोश केला. यावेळी सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

खेदाची गोष्ट म्हणजे घटनेला वर्ष उलटलं तरी पीडितेला न्याय मिळालेला नाही. त्याचबरोबर या खटल्याचं कामही फास्टट्रॅक कोर्टाकडे वर्ग करण्यात आलेलं नाही.

याचा निषेध करत राज्यभरात राष्ट्रवादीनं निषेध आंदोलन केलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, चित्रा वाघ सहभागी झाले होते. पुण्यात झालेल्या मूक मोर्चात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.

सोलापुरातही कोपर्डी घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी कोपर्डी घटनेतील आरोपींना प्रतिकात्मक फाशी देण्यात आली. जमलेल्या आंदोलक महिलांनी आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवून रोष व्यक्त केला.

कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले, “आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.”

राज्यभरात मराठा मूक मोर्चे

कोपर्डी घटनेच्या संतापाची लाट राज्यभर पसरली. या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात मराठा क्रांती मूकमोर्चे निघाले. औरंगाबादेत 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने मोर्चे काढण्यात आले.

संबंधित बातम्या


कोपर्डी बलात्कार आणि हत्येला एक वर्ष पूर्ण


कोपर्डी बलात्कार: साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव!


कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री


मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !


कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार 


नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर


मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई 


अहमदनगरमधील कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचं स्मारक