मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा रवी शास्त्री यांचीच निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे प्रमुख कपिलदेव यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची शास्त्री यांची ही चौथी टर्म दोन वर्षांची असेल. 2021 सालच्या  विश्वचषकापर्यंत ते भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर राहतील. शास्त्री यांच्यासह टॉम मूडी, माईक हेसन, फिल सिमन्स, रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत हे पाचजण भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. त्यातल्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्याची जबाबदारी माजी कर्णधार कपिलदेव, माजी कसोटीवीर अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय समितीवर सोपवण्यात आली होती.


टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीत रवी शास्त्री यांच्या आजवरच्या कामगिरी इतकाच कर्णधार विराट कोहलीचा त्यांना असलेला पाठिंबा निर्णायक ठरला. मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीत तुझा पाठिंबा पुन्हा रवी शास्त्री यांनाच राहणार का, असा प्रश्न विंडीज दौऱ्यावर रवाना होण्याआधी कर्णधार विराट कोहलीला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने शास्त्रींच्या नावाला पसंती दिली होती.

भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतून स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर BCCI ने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले होते.


2017 पासून रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी उंचावली आहे.  यंदाच्या विश्वचषकातही भारताने उपांत्य फेरीपर्यंत दमदार वाटचाल केली. मात्र उपांत्य फेरीतून स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची टी 20 आणि एकदिवसीय मालिका भारताला जिंकून दिल्यानंतर शास्त्री यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा होती.