नवी दिल्लीः टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शास्त्री मीडिया प्रतिनिधी या नात्यानं गेली सहा वर्ष या समितीचे सदस्य होते.


 

जूनमध्ये दरवर्षी आयपीएल फायनलदरम्यान अथवा आयपीएल संपल्यावर आयसीसीच्या क्रिकेट समितीची वार्षिक बैठक घेतली जाते. यंदा लॉर्ड्सवर 2 आणि 3 जून रोजी क्रिकेट समितीची बैठक झाली, पण शास्त्री समालोचनात व्यस्त असल्यानं त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते.

 

कुंबळे समितीच्या अध्यक्षपदावर ठाम

आपण बराच काळ क्रिकेट समितीतील जबाबदारी सांभाळली असून आता दुसऱ्या व्यक्तींना संधी मिळायला हवी, असं शास्त्री यांनी आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांना कळवल्याचं वृत्त आहे.

 

दरम्यान, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आयसीसीच्या क्रिकेट समितीचं अध्यक्षपद सोडण्यास तयार नसून, या दोन्ही भूमिका पार पाडताना हितसंबंधांचा मुद्दा निर्माण होत नसल्याचं कुंबेळनं स्पष्ट केलं आहे. कुंबळेविषयी आयसीसी कोणता निर्णय घेते हे 2 जुलैला आयसीसीच्या वार्षिक सभेच्या समारोपाच्या दिवशीच स्पष्ट होईल.