अकोला : रस्ते विकासाच्या निधीवरुन अकोला महापालिकेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. माईकची तोडफोड, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करणे असा प्रकार महापालिका सभागृहात पाहायला मिळाला. एवढंच नाही तर काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर मदन भरगड यांनी महापालिकेचा चित्रीकरण कॅमेरा हिसकावण्याचाही प्रयत्न केला.
सरकारकडून अकोला महापालिकेला 5.75 कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीचं वाटप करताना सत्ताधारी भाजप-शिवसेनेने विरोधकांना डावलल्याच आरोप करत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह भारिपच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. या गोंधळात भारिपचे नगरसेवक रामा तायडे यांच्या बोटाला दुखापत झाली असून 12 टाके पडले आहेत. इतकंच नाही तर विरोधांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना 'चोर-चोर' म्हणत सभागृह दणाणून सोडलं आहे.
महापौरांनी मात्र या गोंधळाप्रकरणी विरोधकांना दोषी धरलं आहे. सहा विषयांना गोंधळातच मान्यता देत सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली.
दरम्यान, गोंधळ, तोडफोड, हाणामारीच्या आणि शिवीगाळ अशा घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अकोला महापालिकेची ओळख आहे. अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा म्हणजे राजकीय आखाडाच. येथील महापालिकेची गेल्या चार-पाच वर्षातील कोणतीच सभा तोडफोड, हाणामारी आणि गोंधळाशिवाय पूर्ण झालीच नाही.