महाराष्ट्राच्या चिराग खुरानानं दोन विकेटस काढून पुण्यातल्या रणजी सामन्यात रेल्वेला तिसऱ्या दिवसअखेर पाच बाद 330 असं रोखून धरलं आहे. या सामन्यात महाराष्ट्रानं पहिल्या डावात 481 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळं रेल्वेला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अजूनही 151 धावांची गरज आहे. रेल्वेनं आदल्या दिवशीच्या बिनबाद 88 धावांवरून तिसऱ्या दिवशी पाच बाद 330 धावांची मजल मारली. त्यात शिवकांत शुक्ला, प्रथम सिंग आणि नितीन भिल्ले यांच्या अर्धशतकांचा समावेश होता.
स्वप्निल सिंगच्या प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधल्या पहिल्यावहिल्या शतकानं बडोद्याला मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात नऊ बाद 575 धावांचा डोंगर उभारून दिला. त्यामुळं बडोद्याला पहिल्या डावात 404 धावांची आघाडी मिळाली. स्वप्निल सिंगनं 309 चेंडूंत दहा चौकार आणि चार षटकारांसह 164 धावांची खेळी करून त्यात मोलाचा वाटा उचलला. स्वप्निलचं गेल्या 11 वर्षांच्या कारकीर्दीतलं हे पहिलंच शतक ठरलं. दरम्यान, या सामन्यात मुंबईची तिसऱ्या दिवसअखेर चार बाद 102 अशी दाणादाण उडाली आहे. त्यामुळं बडोद्याला या सामन्यात डावाच्या फरकानं विजय मिळवण्याची संधी आहे.
विदर्भाच्या अक्षय वाखरे, ललित यादव, आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीनं रणजी सामन्यात प्रभावी मारा करून बंगालची दाणादाण उडवली आहे. पश्चिम बंगालच्या कल्याणी शहरात सुरू असलेल्या या सामन्यात विदर्भाला डावाच्या फरकानं निर्णायक विजयाची संधी आहे. अक्षय वाखरे, ललित यादव, आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीनं बंगालचा पहिला डाव 207 धावांत गुंडाळून, विदर्भाला पहिल्या डावात 292 धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ललित यादवनं तिसऱ्या दिवसअखेर बंगालची तीन बाद 86 अशी बिकट अवस्था करून ठेवली आहे. या सामन्यात विदर्भाच्या हाताशी अजूनही 206 धावांची आघाडी आहे.