'परशा'चं बॉलिवूड पदार्पण, राधिका आपटे आकाश झळकणार
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2017 10:10 PM (IST)
विशेष म्हणजे राधिका आपटेनेच या भागाची स्क्रिप्टही लिहिली आहे.
मुंबई : 'सैराट' चित्रपटामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता आकाश ठोसर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात चार लघुकथा असून प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी 'परशा'च्या कथेचं दिग्दर्शन केलं आहे. त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे झळकणार आहे. राधिका आणि आकाश मित्र-मैत्रिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत चार दिवस याचं शूटिंग झालं. आकाशचं चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे राधिका आपटेनेच या भागाची स्क्रिप्टही लिहिली आहे. रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांची निर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील उर्वरित कथांपैकी एकीचं दिग्दर्शन झोया अख्तरने केलं असून त्यात भूमी पेडणेकर दिसणार आहे. तर दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित कथेत मनिषा कोईराला एका अनोख्या रुपात दिसणार आहे. 2016 मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर आकाश ठोसर प्रसिद्धीच्या शिखरावर गेला होता. सैराटनंतर महेश मांजरेकरांच्या 'एफयू : फ्रेण्डशीप अनलिमिटेड' चित्रपटात त्याने अभिनय केला होता.