नवी दिल्ली : केदार जाधवच्या महाराष्ट्राला रणजी करंडकाच्या सलामीच्या सामन्यातच पराभवाला सामोरं जावं लागलं. झारखंडनं महाराष्ट्राचा सहा विकेट्नी धुव्वा उडवला.
नवी दिल्लीच्या कर्नेल सिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात महाराष्ट्रानं झारखंडला विजयासाठी अवघ्या 93 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना विराट सिंगनं नाबाद 33 आणि आनंद सिंगनं नाबाद 25 धावांची खेळी रचली. महाराष्ट्रासाठी अनुपम संकलेचा आणि श्रीकांत मुंढेनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.
त्याआधी शाहबाज नदीम, आशीषकुमार आणि वरुण अॅरॉननं महाराष्ट्राचा दुसरा डाव अवघ्या 188 धावांत गुंडाळला होता. महाराष्ट्रानं पहिल्या डावात 210 धावा केल्या होत्या. तर झारखंडनं पहिल्या डावात 306 धावा करुन 94 धावांची आघाडी घेतली होती.