मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शालेय क्रिकेट संघांमध्ये प्रत्येकी 14 खेळाडूंचा समावेश असावा असा प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनसमोर ठेवला होता. एमसीएनंही सचिनच्या या प्रस्तावाला अनुकुलता दर्शवली आहे. रोटेशनल बेसिसवर हे 14 खेळाडू मैदानात उतरतील, त्यामुळं आता शालेय क्रिकेटचा ढाचा बदलण्याची शक्यता आहे.


शालेय क्रिकेटमध्ये अधिकाधिक मुलांना खेळण्याची संधी मिळावी यासाठी सचिननं एमसीएसमोर हा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर एमसीएनं मुंबई स्कूल्स स्पोर्टस असोसिएशनला पत्र लिहून या प्रस्तावाविषयी माहिती दिली. मुंबई स्कूल्स स्पोर्टस असोसिएशननंही गाईल्स शिल्ड आणि हॅरिस शिल्डमध्ये 14 खेळाडूंच्या समावेशाबाबत सकारात्कता दर्शवली. नव्या नियमानुसार फुटबॉल आणि हॉकीप्रमाणेच प्रत्येक संघात 14 खेळाडू असतील. त्यातील 11 जण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरतील. विशेष म्हणजे संघातील सर्व चौदाजण गोलंदाजी करु शकतात. त्यामुळं मुलांमधली खेळातील आवड कमी होणार नाही आणि ड्रेसिंग रुममधल्या प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळेल.

गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण म्हणजेच पर्यायाने क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी या नव्या फॉरमॅटची मदत होणार आहे. सचिनच्या म्हणण्यानुसार, जर एका मोसमात 300 सामने खेळवण्यात आले, तर प्रत्येक सामन्यात सहा नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. त्यानुसार प्रत्येक मोसमात 1800 नव्या खेळाडूंना वाव मिळेल अशी माहिती सचिननं एमसीएला दिली आहे.