कोलकाता: प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या विदर्भ संघाने यंदा कमाल केली आहे. रणजी चषकाच्या इतिहासात विदर्भाने पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक मारली आहे.


महत्त्वाचं म्हणजे सेमी फायनलमध्ये फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने, बलाढ्य अशा विनय कुमारच्या कर्नाटक संघाचा अवघ्या 5 धावांनी पराभव केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भने पहिल्या डावात अवघ्या 185 धावा केल्या होत्या. आदित्य सरवटे 47 धावांची खेळी करून विदर्भला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याला वसिम जाफरने 39 धावा करून उत्तम साथ दिली.

विदर्भची ही तुटपुंजी धावसंख्या पाहून, बलाढ्य कर्नाटकसमोर त्यांचा ठावठिकाणा लागणार नाही, असं अनेकांना वाटत होतं. पहिल्या डावात झालंही तसंच. कर्नाटकने पहिल्या डावात करुण नायरच्या (153) शतकाच्या जोरावर 301 धावा करून 116 धावांची आघाडी घेतली.

विदर्भकडून उमेश यादवने 4 तर  रजनीश गुरुबानीने 5 गडी बाद केले.

विदर्भानं दुसऱ्या डावात जबाबदारीने खेळ करत 313 धावा केल्या. सतिश गणेशनं 81 तर अदित्य सरवटेनं 55 धावा केल्या.

विजयासाठी 197 धावांचं आव्हान मिळालेल्या कर्नाटकला विजय सहज आणि सोपा होता. पण रजनीश गुरुबानीनं 7 विकेट घेत विदर्भाला अक्षरशः एक हाती विजय मिळवून दिला. गुरुबानीने दोन्ही डावात मिळून 12 विकेट्स घेतल्या.

कर्णधार विनयकुमारनं३६ धावा करत एकाकी झुंज दिली.

विशेष म्हणजे मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघाचे प्रशिक्षक आहेत.

दरम्यान, रणजी चषकाची फायनल आता विदर्भ आणि दिल्ली यांच्यात रंगणार आहे. येत्या 29 डिसेंबरपासून इंदोरमध्ये हा सामना होईल.

संबंधित बातम्या

रणजी ट्रॉफी : विदर्भ इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत