जयपूर : अजिंक्य रहाणेच्या राजस्थान रॉयल्सने महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा एक चेंडू आणि चार विकेट्सनी पराभव करून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. राजस्थान रॉयल्सच्या या विजयात सलामीच्या जॉस बटलरने प्रमुख भूमिका बजावली. त्याने 60 चेंडूंत अकरा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 95 धावांची खेळी उभारली.

राजस्थान रॉयल्सचा संघ या सामन्यासाठी नव्या रंगाच्या जर्सीसह मैदानात उतरला होता. या नव्या रंगाची जर्सी पाहून अनेक प्रेक्षकही काही काळासाठी गोंधळून गेले. मात्र कॅन्सरविषयी जनजागृतीसाठी राजस्थान रॉयल्सने पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच या रंगाच्या जर्सीत काल राजस्थान रॉयल्सचा संघ मैदानात उतरला होता.

राजस्थान रॉयल्सने ‘कॅन्सर आऊट’ (#CancerOut) ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागरुकता व्हावी यासाठी शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज सोबतच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सच्या सर्व खेळाडूंनी गुलाबी रंगाची जर्सी घातली. गुलाबी रंगाच्या जर्सीच्या माध्यमातून या खेळाडूंनी ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती केली.

या सामन्यात जॉस बटलरच्या खेळीने राजस्थानला एक चेंडू राखून 177 धावांचं लक्ष्य गाठून दिलं. राजस्थानच्या खात्यात आता 11 सामन्यांमध्ये पाच विजयांसह 10 गुण आहेत. राजस्थानसह मुंबई आणि कोलकात्याच्या खात्यातही पाच विजयांसह 10 गुण आहेत. त्यामुळे त्या तीन संघांत प्ले ऑफच्या तिकीटासाठी तीव्र चुरस राहिल. तसंच चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असली, तरी प्ले ऑफच्या तिकीटासाठी त्यांना किमान एक विजय मिळवणं आवश्यक आहे.