पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याशी बातचित :
औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 12 May 2018 07:34 AM (IST)
मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दोन गटात झालेल्या वादात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. सध्या औरंगाबादेत जमावबंदी असून तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन औरंगाबाद पोलिस आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. काल संध्याकाळी मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी हवेत गोळीबार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे कसोशीनं प्रयत्न सुरु आहेत. काल संध्याकाळपासून मोतीकारंजा परिसरात वाद सुरु असल्यानं तणावाची स्थिती आहे. दरम्यान, औरंगाबादचे पालकमंत्री दीपक सावंत, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील हे औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.