नवी दिल्ली: भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो फ्रीस्टाइल गटात धडाकेबाज कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात विनेश फोगाटने माजी सुवर्णपदक विजेत्या आणि जगातील नामवंत मल्लांमध्ये गणना होणाऱ्या क्युबाच्या गुझमान लोपेझ हिला अस्मान दाखवत विजय खेचून आणला होता. या विजयामुळे विनेश फोगाटने 50 किलो फ्रीस्टाइल गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता विनेश फोगाट ही सुवर्णपदक मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.


काही महिन्यांपूर्वी याच विनेश फोगाटने दिल्लीत भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आणि भाजपचे बाहुबली नेते ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आवाज उठवला होता. ब्रिजभूषण सिंह यांनी खेळाडूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा तिने केला होता. याविरोधात विनेश फोगाट हिच्यासह भारतीय पैलवानांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करायला तयार नसल्याने विनेश फोगाट आणि तिचे सहकारी जंतरमंतर येथे ठिय्या मांडून बसले होते. या सगळ्यांनी आपल्याला मिळालेले सरकारी पुरस्कारही परत केले होते. मात्र, पोलिसी बळाचा वापर करत हे आंदोलन मोडीत काढण्यात आले होते. यावेळी विनेश फोगाट हिच्यासह अन्य कुस्तीपटूंना पोलिसांनी रस्त्यावरुन फरफटत गाडीत डांबले होते. या सगळ्याचा छायाचित्रं आणि व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या सगळ्यामुळे भाजप समर्थकांनी विनेश फोगाट हिच्यावर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर विनेश फोगाट हिचे पॅरिस ऑलिम्पिकमधील यश विशेष लक्ष वेधून घेत आहे.


राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?


एकाच दिवशी जगातील तीन धुरंधर पैलवानांना हरवल्यानंतर आज विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे. ज्यांनी विनेश फोगाट आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष नाकारला त्यांची नियत आणि योग्यतेवर शंका उपस्थित झाल्या आहेत. त्या सर्वांना उत्तर मिळाले आहे. ज्यांनी विनेशला प्रचंड त्रास दिला त्या सत्ताधाऱ्यांची संपूर्ण यंत्रणा भारतमातेच्या या लेकीसमोर जमीनदोस्त झाली आहे. चॅम्पियन्सची हीच खासियत असते, ते मैदानातील आपल्या कामगिरीने प्रत्युत्तर देतात. विनेश तुला खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुझ्या विजयाचा जयघोष दिल्लीपर्यंत स्पष्ट ऐकू येतोय, असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 



अंतिम सामन्यात विनेश फोगाट कोणाला भिडणार?


अंतिम सामन्यात विनेश फोगाटसमोर अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडचे तगडे आव्हान असणार आहे. 2020 मध्ये खेळल्या गेलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सारा हिल्डब्रँडने 50 किलो गटात कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने चार वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या देशाला पदक मिळवून दिले होते. मात्र, विनेशने उपांत्य फेरीत सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या क्युबाच्या गुझमान लोपेझ हिचा पराभव केल्याने तिचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे.


आणखी वाचा


फायनलमध्ये धडक मारल्यानंतर विनेश फोगाटचा व्हिडीओ कॉल, आई म्हणाली, बेटा गोल्ड लेके आना है!