वेलिंग्टन : एकीकडे अंडर-19 विश्वचषकातील कामगिरीमध्ये सातत्य ठेवणं आणि दुसरीकडे आयपीएलचा लिलाव अशी खेळाडूंची परिस्थिती आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये भारताच्या अंडर-19 संघातील अनेक खेळाडू असतील. खेळाडूंची ही द्विधा मनस्थिती त्यांचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यापेक्षा चांगली कुणीही समजू शकत नाही.


आयपीएलच्या लिलावापूर्वी द्रविडने खेळाडूंना कानमंत्र दिला आहे. आयपीएल लिलावाची चिंता न करता पूर्ण लक्ष विश्वचषकावर केंद्रित करावं, असं द्रविडने युवा खेळाडूंना सांगितलं आहे.

तीन वेळच्या चॅम्पियन टीम इंडियाने बांगलादेशचा धुव्वा उडवत अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर या आयपीएल मोसमासाठीचा लिलाव शनिवार आणि रविवारी बंगळुरुत होत आहे.

या लिलावात कर्णधार पृथ्वी शॉ, शुभमान गिल, हिंमाशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, अर्शदीप सिंह आणि हार्विक देसाई या खेळाडूंचा समावेश आहे.

''आयपीएल लिलावाकडे आमचं लक्ष नसल्याचा देखावा करण्याची गरज नाही. आमची यावर चर्चाही झाली आहे. मात्र आम्ही आमचं लक्ष मोठ्या ध्येयाकडे केंद्रित केलं आहे,'' असं द्रविड म्हणाला.  तो ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना.

''आयपीएल लिलाव म्हणजेच सगळं काही नाही. एक किंवा दोन लिलावांनी खेळाडूंच्या करिअरवर फार मोठा परिणाम होणार नाही. आयपीएल लिलाव दरवर्षी येईल, मात्र भारतासाठी विश्वचषक खेळण्याची संधी त्यांना पुन्हा पुन्हा मिळणार नाही,'' असं द्रविड म्हणाला.