मुंबई : भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज के एल राहुलने आयसीसीच्या  टी-ट्वेण्टी क्रमवारीत मोठी झेप घेत तिसरं स्थान मिळवलं आहे. नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-ट्वेण्टी मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीचा राहुलला फायदा झाला.

काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीचं या क्रमवारीत स्थान घसरलं आहे. ढासळलेल्या कामगिरीमुळे कोहली आठव्या स्थानावरुन 12 व्या स्थानावर पोहचला आहे.

राहुलने मागील चार टी-ट्वेण्टी सामन्यात 70, 101*, 6 आणि 19 अशा धावा केल्या होत्या. रोहित शर्मा फलंदाजांच्या या क्रमवारीत 11 व्या स्थानी आहे. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-ट्वेण्टी सामन्यात नाबाद 100 धावांची खेळी केली होती.

दरम्यान,ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज अॅरॉन फिन्चने आयसीसीच्या  टी-ट्वेण्टी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.तसंच आंतरराष्ट्रीय टी-ट्वेण्टीमध्ये 900 गुण मिळवणारा फिन्च पहिलाच फलंदाज ठरला. तर कामगिरीतील सातत्याच्या जोरावर पाकिस्तानच्या फखर झमानने दुसरं स्थान मिळवलं आहे.

दुसरीकडे, गोलंदाजांच्या टी-ट्वेण्टी क्रमवारीत अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या तर पाकिस्तानचा शादाब खान दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.