वसई : वसई पूर्व भागात असलेल्या मिठागरातील वस्तीमध्ये 400 जण अडकून पडले आहेत. वस्तीच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सर्वांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

वस्तीत अडकलेल्या रहिवाशांना होड्यांचा आधारे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आपलं घर सोडून येण्याची त्यांची तयारी नसल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत.

सलग चार दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे पहाटे चार वाजल्यापासून रहिवाशांच्या घरात पाणी शिरु लागलं. सकाळपर्यंत कोणतीही यंत्रणा वस्तीपर्यंत पोहचली नाही. 'एबीपी माझा'ने बातमी दाखवल्यावर आपत्कालीन यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी आणि तहसीलदार यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. घरात चोरी होण्याची भीती असल्यामुळे रहिवासी घर सोडण्यास तयार नाहीत. रहिवाशांच्या भूमिकेमुळे बचावकार्य कसं करायचं, हा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे. रहिवाशांना घरात अन्न पुरवण्यात येत आहे.

वसई स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावर अंबाडी पुलाच्या आतून जाणाऱ्या मिठागराच्या जमिनीत ही वस्ती आहे. गेल्या पन्नास वर्षापासून मिठागरात काम करणाऱ्या कामगारांची ही वस्ती तयार झाली होती. आता दीडशे कुटुंबं या वस्तीत राहतात.