मुंबई : मुंबई आणि उपनगरांसह संपूर्ण राज्याला पावसाने सकाळपासून झोडपून काढले आहे. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगली हजेरी लावली. राज्यात अनेक ठिकाणी समानाधामकारक पाऊस पडला आहे.
मुंबईसह उपनगरात कोसळधार
सकाळपासून सुरु असलेल्या पावसाची मुंबईसह उपनगरात कोसळधार सुरुच आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पावसामुळे लोकल वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तर सखल भागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या मुंबई उपनगरांसह ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. काजूपाड़ा परिसरात पाणी साचल्याने मुंबई अहमदाबाद महामार्ग बंद करण्यात आला आहे.
रायगडमध्येही पावसाची संततधार
सकाळपासून रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगडधील अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पालीनजीकच्या पुलावरुन पाणी गेल्याने वाकण ते खोपोली वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोकणात मुसळधार
आज सकाळपासून कोकणालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कुडाळमधल्या कर्ली नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळपासूनच कोकणातील आंबोली, मांगेली, सावडाव आणि नापणे अशा धबधब्यांवर पर्यटकांनी गर्दी केली होती. पावसाचा जोर वाढत असल्यानं पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. अजूनही कोकणात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल औरंगाबादेत काही तास पाऊस झाला. गेल्या आठवडाभरापासून कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. मात्र मराठवाड्यात पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजानं बळीराजा चांगलाच सुखावला आहे.
विदर्भातही मुसळधार पाऊस
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अनेक नाले धो धो वाहू लागले आहेत. घोंसा परीसरात पाऊस आल्यामुळे मानकी, पेटुर नाल्याला मोठा पुर आला.