डर्बन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाने विजयाने सुरुवात केली. कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब आहे.


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने धवन बाद झाल्यावर जबाबदारी पार पाडत शतकी खेळी केली. अजिंक्य रहाणेच्या साथीने त्याने मोठी भागीदारी रचत विजयी खेळी केली. अजिंक्य रहाणेने केलेल्या 79 धावांच्या खेळीने भारताला लक्ष्य गाठण्यास मोठी मदत केली.

रहाणेने केलेली 79 धावांची खेळी आणि दक्षिण आफ्रिका यांचा योग पुन्हा एकदा जुळून आला. यापूर्वी मेलबर्नमध्ये 22 फेब्रुवारी 2015 रोजी झालेल्या वन डे सामन्यातही रहाणेने 60 चेंडूत 131 च्या स्ट्राईक रेटने 79 धावा केल्या होता. या खेळीला 7 चौकार आणि 3 षटकारांचा साज होता.

डर्बनमध्येही अजिंक्य रहाणेने 79 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 फेब्रुवारी 2018 म्हणजे काल झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेने 86 चेंडूत 91.86 च्या स्ट्राईक रेटने 79 धावांची खेळी केली. यामध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.