Rafael Nadal Retirement : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. 2005 नंतर राफेल नदाल पहिल्यांदाच फ्रेंच ओपनमध्ये खेळणार नाही. राफेल नदाल याने 2005 मध्ये टेनिस विश्वात पदार्पण केले होते. तेव्हापासून ते प्रत्येक फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभागी होता. पण 18 वर्षात पहिल्यांदाच त्याने फ्रेंच ओपन स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतलाय. राफेल नदाल याने निवृत्तीचे संकेतही दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना 2024 हे वर्ष टेनिसमधील अखेरचे असेल, असे सांगितलेय.


आजच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिसपटूंच्या यादीत नदाल याचे नाव घेतले जाते.  राफेल नदालने आजपर्यंत 22 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. या वर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये राफेल नदालला दुसऱ्या फेरीतच बाहेर पडावे लागले होते. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हापासून आजपर्यंत तो मैदानात परतू शकलेला नाही. राफेल नदाल हा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू आहे. त्याने 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. अलीकडेच नोव्हाक जोकोविचने त्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोन खेळाडूंमध्ये टेनिस विश्वातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची शर्यत आहे.  






फ्रेंच ओपनमध्ये नदालचं वर्चस्व 


फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालने आजवर अफलातून कामगिरी केली आहे. त्याने 22 पैकी 14 ग्रँडस्लॅम जेतेपद फक्त फ्रेंच ओपनमध्ये जिंकले आहेत. त्याला या स्पर्धेत पराभूत करणं कोणालाही सोपं गेलेलं नाही. दरम्यान आता नदाल मेपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही, तर जोकोविचला ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या शर्यतीत पुढे जाण्याची संधी असेल.


राफेल नदालच्या नावावर 22 ग्रँडस्लॅम


फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक स्पेनच्या राफेल नदालनं जागतिक क्रमवारीत 8 क्रमांकाच्या नॉर्वेजियन कॅस्पर रुडचा पराभव केला. या विजयासह राफेल नदालनं चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचं विजेतेपद जिंकलं. तर, 22वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं.









नदालनं 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019, 2020, 2022 मध्ये असं 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर, 2009 आणि 2022 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.  याशिवाय, त्यानं 2008 आणि 2010 मध्ये वम्बिलडन आणि  2010, 2013, 2017, 2019 मध्ये यूएस ओपनचा खिताब जिंकला आहे.