गॉल (श्रीलंका): टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक कुंबळेच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील वाद मागे पडला असून आता नवे कोच रवी शास्त्रीं यांचा संपूर्ण संघावर सकारात्मक प्रभाव पडेल. असं मत अश्विननं व्यक्त केलं आहे.
श्रीलंकेतील सरावानंतर अश्विननं पत्रकारांशी संवाद साधला. 'आम्ही त्या वादापासून (कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील मतभेद) पुढे निघून गेलो आहोत. काय तो निर्णयही झाला आहे आणि हे असं प्रकरण आहे की, ज्याबाबत मी फार काही बोलू शकत नाही.' असं अश्विन म्हणाला.
अश्विन पुढे म्हणाला की, 'रवी भाई एक भारी माणूस आहे. त्यांना ड्रेसिंग रुममध्ये आमच्यासोबत पाहणं चांगलं वाटतं. मागील वेळेस आम्ही गॉल कसोटी गमावली होती. तेव्हा आम्ही फार निराश झालो होतो. तेव्हा शास्त्रींनीच आम्हाला त्यातून बाहेर काढलं. त्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये त्यांचा सकारात्मक प्रभाव पडेल असं मला वाटतं. आम्ही सोबत काम करु ज्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.'
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात वाद असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.
कोहली-कुंबळे वादावर आर. अश्विनची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2017 10:51 AM (IST)
टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींची नेमणूक झाली असली तरी अजूनही कर्णधार कोहली आणि माजी प्रशिक्षक कुंबळे यांच्यातील वादाबाबत चर्चा सुरुच आहे. याच वादाबाबत आता फिरकीपटू अश्विननं प्रतिक्रिया दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -