मुंबई : गायक सोनू निगमनंतर अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीनंही अजानवरुन ट्वीट करुन पुन्हा वाद निर्माण केला आहे. मात्र त्यावर टिका करताना  समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचीही भाषा घसरली.

मी जेव्हा सकाळी 4.45 वाजता घरी आले.. त्यावेळी अजानचा सर्वाधिक आक्रमक आणि कर्णकर्कश आवाज माझ्या कानी पडतो. असं तिनं आपल्या ट्विटमध्ये म्हणलंय


अजान संदर्भातीलच आणखी एका ट्वीट सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणते की, ''भारतात सर्वात मोठ्या आवाजानं अजान सुरु होते, भारतातल्या अजानचा आवाज हा मुस्लिम राष्ट्रांमध्ये होणाऱ्या अजानपेक्षाही मोठा आहे.''

पण सुचित्राच्या ट्विटबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आपली भूमिका माडताना त्यांची जीभ घसरली.  ''तोकडे कपडे घालून सिनेमात काम करणं, रात्र-रात्रभर दारु रिचवणं यात काहीच कसं गैर वाटत नाही''असं आझमी यांनी म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायक सोनू निगमनं अजानसंदर्भात वादग्रस्त ट्वीट करुन आक्षेप नोंदवला होता. मी मुस्लीम नाही, तरी अजानमुळे माझी झोपमोड का?, असा सवाल करत, सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी मुस्लिम धर्माच्या अजानवर आक्षेप घेतला होता.

या ट्वीटनंतर सोनू निगमविरोधात पुण्यात याचिका दाखल करण्यात आली होती. तर अजानबाबत वक्तव्य केल्याने पश्चिम बंगालमधील सौय्यद शाह आतिफ अली अल कादरी यांनी सोनू निगमला जाहीर धमकी दिली होती. या मौलवीने सोनू निगमविरोधात घोषणा केली होती की, सोनूची टक्कल करणाऱ्याला  10 लाखांचं बक्षीस दिले जाईल.

दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी सोनू निगमची पाठराखण केली होती. ‘नमाजसाठी अजान महत्त्वाची आहे. पण आजच्या आधुनिक युगात लाऊडस्पीकर गरजेचं नाही.’ असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबूभाईं हे देखील सोनू निगमच्या समर्थनार्थ मैदानात उतरले होते. त्यांच्या मते, “इस्लाममध्ये दर्गा किंवा मशिदीवरील लाऊडस्पीकरला कोणतेही स्थान नाही. कुराण ए शरीफच्या आयतनुसार, खऱ्या मनाने केवळ तोंडी अजानच मान्य आहे. त्यासाठी कोणत्याही लाऊड स्पीकरची गरज नाही”

आता सुचित्रा कृष्णमूर्तीनं अजानबाबत आक्षेप नोंदवल्यानं पुन्हा या वादाला तोंड फुटलं आहे. मात्र तिच्या ट्वीटवर आक्षेप नोंदवताना आमदार अबू आझमींची जीभ घसरली.

संबंधित बातम्या

पुण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज

मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम

‘अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही’, सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य

अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमचा माफीनामा

सोनू निगमच्या हेअर स्टायलिस्टला मौलवी 10 लाख रुपये देणार?