ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक केल्यामुळे टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आपण अशा देशात राहतो, ज्याची संस्कृती ‘अतिथि देवो भव’ आहे, असं अश्विनने म्हटलं आहे.
दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हॉटेलकडे जात होता. त्यावेळी बसवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये बसची काच फुटली.
या हल्ल्याचा फोटो अॅरॉन फिंचने ट्विट केला. “हॉटेलकडे जात असताना टीम बसच्या खिडकीवर दगड मारण्यात आला. हे खूपच भीतीदायक होतं”, असं फिंचने म्हटलं आहे.
गुवाहटीमध्ये सात वर्षांनी काल आंतरराष्ट्रीय सामना झाला. यापूर्वी या मैदानावर 2010 मध्ये सामना खेळवण्यात आला होता. सात वर्षांनी या मैदानात विजय पाहायला मिळेल, अशी आशा चाहत्यांना होती, मात्र पराभवामुळे चाहते नाराज झाले.
दरम्यान अरॉन फिंचचं ट्विट ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने रिट्विट केलं आहे.