इंदूर : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्नन अश्विननं आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे. सध्या सुरु असलेल्या इंदूर कसोटीत अश्विननं मायदेशात 250 कसोटी विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. अश्विननं बांगलादेशी कर्णधार मोमिनुल हकला त्रिफळाचीत केलं. अश्विनच्या कसोटी कारकीर्दीतली ही आजवरची 358 वी तर घरच्या मैदानावर खेळताना त्यानं घेतलेली 250वी विकेट ठरली. अश्विननं इंदूरमधल्या कामगिरीसह सर्वाद जलद 250 विकेट्स घेणाच्या मुरलीधरनच्या विक्रमाशीही बरोबरी साधली. मुरलीधरन आणि अश्विन या दोघांनीही 42 कसोटीत अडीचशे विकेट्सचा टप्पा पार केला.


कसोटीत मायदेशात सर्वात जलद 250 विकेट्स घेणारे गोलंदाज

रविचंद्रन अश्विन (भारत) - 42 कसोटी
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 42 कसोटी
अनिल कुंबळे (भारत) - 43 कसोटी
रंगना हेराथ (श्रीलंका) - 44 कसोटी
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) - 49 कसोटी

मायदेशात 250 कसोटी विकेट्स घेणारा अश्विन हा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला.याआधी भारताचा महान लेग स्पिनर अनिल कुंबळे (350 )आणि हरभजन सिंगनं (265) मायदेशात 250 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

रविचंद्रन अश्विन हा मायदेशातला सर्वात प्रभावी गोलंदाज मानला जातो. भारतीय खेळपट्ट्यांवर अश्विनची फिरकी नेहमीच प्रभावी ठरली आहे. अश्विन आजवरच्या कारकीर्दीतला 69वा कसोटी सामना खेळत आहे. त्यानं घरच्या मैदानात 42 तर परदेशी भूमीवर 27 कसोटी खेळल्या आहेत.

अश्विनची कसोटी कारकीर्द

सामने - 69
विकेट्स - 359
सरासरी - 25.40

अश्विनची मायदेशातली कसोटी कामगिरी

सामने - 42
विकेट्स - 251
सरासरी - 22.83

अश्विनची परदेशातली कसोटी कामगिरी

सामने - 27
विकेट्स - 108
सरासरी - 31.39