इंदूर : इंदूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियानं बांगलादेशवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. टीम इंडियाच्या प्रभावी आक्रमणासमोर इंदूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. बांगलादेशच्या डावात एकाही फलंदाजाला मोठी खेळी उभारण्यात अपयश आलं. त्यांची सुरुवातीलाच तीन बाद 31 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मुशफिकुर रहीम आणि कर्णधार मोमिनुल हकनं 68 धावांची भागीदारी रचून डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण रहीम आणि हक बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव कोसळला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि ईशांत शर्मानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


बांगलादेशचा डाव झटपट गुंडाळल्यानंतर पहिल्या दिवसअखेर भारतानं एक बाद 86 धावांची मजल मारली होती. खेळ संपला तेव्हा मयांक अगरवाल 37 तर चेतेश्वर पुजारा 43 धावांवर खेळत होते. सलामीचा रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर मयांक आणि पुजारानं 72 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारतीय डावाला आकार दिला. दरम्यान पहिल्या डावाच्या आघाडीपासून भारत अजून 64 धावा दूर आहे.


त्याआधी, बांगलादेशचे शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. दुसऱ्या सत्रात कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदीरी केली. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. मोमिनुलने 8 चौकारांसह 80 चेंडूत 37 धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 105 चेंडूत 43 धावा केल्या. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. अखेर बांगलादेशचा डाव 150 धावांत आटोपला.