लातूर : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार्‍या भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल (IND vs NZ Semifinal) सामन्यादरम्यान काही मोठ्या घटना घडेल, अशी धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) थेट लातूरमधून (Latur) अटक करण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना धमकी दिली होती. त्यामुळे, मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम आणि परिसरात चोख बंदोबस्त वाढवला होता. विशेष म्हणजे, धमकी देणाऱ्या व्यक्तीने ट्विटरवर (Twitter) मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केले आहे. याशिवाय सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा संदेश देणारा फोटोही पोस्ट करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी तपास करत त्याला लातूरमधून ताब्यात घेतले आहे. 


वानखेडे स्टेडियमवरील भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात गोंधळ होणार असल्याचा 'इशारा' समाजमाध्यमांतून दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने लातूर येथील एका 17 वर्षीय तरुणास ताब्यात घेतले आहे. स्वतःस क्रिकेटप्रेमी म्हणवणाऱ्या या तरुणाने ट्विटरवरून हा इशारा दिला होता. सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असून, वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत- न्यूझीलंड सामन्यादरम्यान गोंधळ होणार आहे, अशा आशयाचा इशारा त्याने ट्विटरवरील पोस्टद्वारे दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने दखल घेत तपास सुरु केला होता. दरम्यान, पोलिसांनी धमकी आलेल्या ट्विटर हँडलचा तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता, हे ट्वीट लातूरमधून करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने थेट लातूरमधून या तरुणाला ताब्यात घेतले आहे. 


मुंबई पोलिसांना पोस्ट केली 'टॅग'...


विशेष म्हणजे, धमकी देणाऱ्या तरुणाने ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हातबॉम्ब आणि बंदुकीच्या गोळ्यांची चित्रेही त्याने पोस्ट केली होती. तसेच, त्याने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांचे अधिकृत ' ट्विटर हँडल ही टॅग केले होते. यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून स्टेडियम आणि परिसरातील बंदोबस्तात अधिक वाढ केली होती. 


स्टेडियम आणि परिसरात मोठा बंदोबस्त...


भारत- न्यूझीलंड सामन्यादरम्यान कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांकडून 150 हून अधिक अधिकाऱ्यांसह सुमारे 600 पोलीस कर्मचारी, ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच जलद प्रतिसाद दल, राज्य राखीव पोलीस बल आणि दंगल नियंत्रक पथकातील पोलीस असा मोठा बंदोबस्त तेथे ठेवण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून परिसरात सतत पेट्रोलींग करण्यात येत होती. सोबतच मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी देखील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. 


इतर महत्वाच्या बातम्या:


IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वीच मुंबई पोलिसांना धमकी; वानखेडेवर मोठ्या घटना घडण्याचा दावा