Singapore Open Badminton 2022 Final: सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) चीनच्या वांग झि यि (Wang Zhi Yi) हीचा  21-9, 11-21, 21-15 असा पराभव केलाय. या कामगिरीसह पीव्ही सिंधू सुपर 500 विजेतेपदाची विजेती ठरलीय. पहिल्यांदाच पीव्ही सिंधूनं सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 


सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित पीव्ही सिंधूनं वांगविरुद्ध पहिला सेट एकतर्फी जिंकला. त्यानंतर दुसरा सेट जिंकून वांगनं पुनरागमन केलं. मात्र, अखेरच्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं बाजी मारली. सिंगापूर ओपनचे सुपर 500 विजेतेपद पटकावून पीव्ही सिंधूनं कॉमेनवेल्थ गेम्सपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पीव्ही सिंधूचं हे तिसरे पदक आहे. यावर्षी तिनं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये प्रथम कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनचे विजेतेपदही पटकावलं होतं.


एएनआयचं ट्वीट-



उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूचा धडाकेबाज कामगिरी
सिंगापूर ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूनं जपानच्या सेईना कावाकामीविरुद्ध एकहाती विजय मिळवला. चायनीज तैपेईच्या अग्रमानांकित ताय झू यिंगनं दुसऱ्या फेरीत माघार घेतल्यानं कावाकामीला पुढं चाल देण्यात आली होती. सिंधूनं कावाकामीविरुद्धच्या याआधीच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले. 2018 च्या ओपन स्पर्धेत सिंधूचा तिच्याशी अखेरचा सामना झाला होता. 


कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी पीव्ही सिंधू सज्ज
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं कॉमनवेल्थ गेम्ससाठी जाहीर केलेल्या भारतीय तुकडीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन यांसारख्या मोठ्या चेहऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत बजरंग पुनिया, रवी कुमार दहिया, मनिका बत्रा, विनेश फोगट, हिमा दास आणि अमित पंघल हे देखील या संघात आहेत. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेश भंडारी यांना भारतीय संघाचे संघप्रमुख बनवण्यात आलंय. 


हे देखील वाचा-