मुंबई: भारताच्या ऑलिम्पिक रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूनं स्पेनच्या ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या कॅरोलिना मरिनचा 21-17, 21-13 असा धुव्वा उडवून जागतिक बॅडमिंटन सुपर सीरीजच्या उपांत्य फेरीत धडक मारली.


या स्पर्धेत सिंधूनं सलामीच्या साखळी सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीवर तीन गेम्समध्ये विजय मिळवला होता. पण दुसऱ्या साखळी सामन्यात सिंधूला चीनच्या सू यूकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं उपांत्य फेरीतल्या प्रवेशासाठी सिंधूला अखेरच्या साखळी सामन्यात कॅरोलिना मरिनला हरवणं आवश्यक होतं.

सिंधूनं मरिनचा कडवा संघर्ष 46 मिनिटांमध्ये मोडून काढला आणि रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमधल्या आपल्या पराभवाचा वचपा काढला. तिने मरिनचा 21-17, 21-13 ने पराभव करुन उपांत्य फेरित धडक मारली आहे.