मुंबई: राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या 10 कोटीच्या जुन्या नोटा पोलिसांनी पकडल्यानंतर मोठं राजकारण सुरु झालं आहे.  बँकेची गाडी नाही, सोबत सुरक्षारक्षक नाही, मग अशावेळी जुन्या नोटांचा साठा कुठं चालला होता? याची चौकशी करा अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.


टिळकनगर पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या गाडीत काल रात्री 10 कोटी 10 लाख रुपयाची रोकड सापडली. ही रक्कम भाजप खासदार प्रीतम मुंडे संचालिका असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेची आहे.

त्यातली 10 कोटीची रक्कम जुन्या नोटांमध्ये आहे. तर 10 लाख रुपयांची रक्कम 2 हजाराच्या नव्या नोटांमध्ये आहे.

घाटकोपरच्या शाखेतून ही रक्कम पुण्याच्या शाखेकडे नेण्यात येत होती, असं सांगितलं जातं.

बँकेचे जनरल मॅनेजर विनोद खर्चेंच्या दाव्यानुसार परळीच्या मुख्य शाखेतून मुंबईला एकूण 25 कोटी रुपयाची रक्कम पाठवण्यात आली होती.

ज्यातली 10 कोटी 10 लाखाची रक्कम घाटकोपरहून पिंपरी-चिंचवडला पाठवली जात होती. मग उरलेली 15 कोटीची रक्कम कुठं गेली? आणि जुन्या नोटा परळीहून मुंबईला आणि मुंबईहून पुन्हा पिंपरी चिंचवडला का पाठवल्या जात होत्या.? हा प्रश्न आहे

वैद्यनाथ सहकारी बँकेची रक्कम पकडल्यानंतर नाबार्डच्या अधिकाऱ्यांनीही चौकशी सुरु केली आहे.

मात्र टिळकनगर पोलिसांनी रोकड घेऊन जाणाऱ्या तिघांना चौकशीनंतर सोडून दिलं आहे.

नोटाबंदीला महिना उलटून गेलाय. एटीएम बाहेरच्या रांगा कायम आहेत. त्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित बँकांची रोकडही सापडल्यानं संशयाचं वातावरण आहे. जे निष्पक्ष चौकशीशिवाय निवळणार नाही इतकंच.

धनंजय मुंडेंकडून चौकशीची मागणी

याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

"ही रक्कम ज्या बँकेच्या शाखेत जाणार होती, त्या बँकेच्या शाखेचा टर्नओव्हर तितका आहे का हे तपासलं पाहिजे. जर एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या शाखेत जाणाऱ्या या नोटा असतील, तर त्या नव्या नोटा असल्या पाहीजेत. 1000 च्या नोटा तर बंद झाल्या आहेत", असं धनंजय मुंडे म्हणाले.

याशिवाय या नोटा नेमक्या कुणाच्या आहेत? त्या कशासाठी आणल्या जात होत्या त्याची चौकशी ED आणि आरबीआयने करावी, अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे.

एकीकडे भाजप स्वतः चा काळा पैसा पांढरा करतंय. आणि दुसरीकडे सामान्य माणूस तासंतास रांगेत उभ राहून त्रास सहन करतोय. सरकारने याची चौकशी करावी, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

संबंधित बातमी
'त्या' 10 कोटींचा माझ्याकडे पूर्ण हिशेब : प्रीतम मुंडे

मुंबईत कारमधून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त