नवी दिल्ली : भारताच्या पी. व्ही. सिंधूनं इंडिया ओपन वर्ल्ड सुपर सीरिजचं विजेतेपद पटकावलं आहे. ऑलिम्पिक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनचा कडवा संघर्ष मोडित काढून तिने हा विजय मिळवला. सिंधूने पहिल्यांदाच इंडिया ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

21-19, 21-16 अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करुन इंडिया ओपन महिला एकेरीचं विजेतेपद सिंधूने पटकावलं. तिनं हा सामना अवघ्या 47 मिनिटांमध्ये जिंकला.

सिंधू आणि कॅरोलिना मरिनमधला हा अंतिम सामना म्हणजे रिओ ऑलिम्पिकच्या फायनलचा रिप्ले होता. रिओ ऑलिम्पिकच्या फायनलनंतर सिंधू आणि कॅरोलिना तिसऱ्यांदा आमनेसामने आल्या होत्या. त्यात सिंधूनं मिळवलेला हा दुसरा विजय ठरला. त्यामुळे सिंधू आणि कॅरोलिना मरिन या दोघींमधल्या एकमेकींविरुद्धच्या विजयांचं समीकरण आता 4-5 असं झालं आहे.

कॅरोलिना मरिननं प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये सिंधूवरचं वर्चस्व कायम राखलं होतं. पण सिंधूनं डिसेंबरमध्ये झालेल्या दुबई सुपर सीरीज फायनल्समध्ये कॅरोलिना मरिनला हरवलं. त्यानंतर सिंधूनं कॅरोलिना पुन्हा एकदा बाजी उलटवून इंडिया ओपनचं विजेतेपद पटकावलं.

नवी दिल्लीच्या सिरी फोर्ट संकुलात खेळवण्यात आलेल्या इंडिया ओपन वर्ल्ड सुपर सीरीजची फायनल पाहण्यासाठी भारतीय क्रीडारसिकांनी रविवारी तुफान गर्दी केली होती. हा सामना पाहताना महिला एकेरीतल्या दोन सर्वोत्तम खेळाडूंमधला कठोर संघर्ष पाहण्याची संधी प्रेक्षकांनी मिळाली.