नवी दिल्ली : मद्यप्राशन करुन गाडी चालवणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. कारण वाहनचालकांची नशा उतरवणारा नवीन कायदा केंद्र सरकारनं मंजूर केला आहे. या नव्या कायद्यानुसार आता मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्या चालकांकडून पाचपट दंड वसूल केला जाणार आहे.


मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे. या सुधारित कायद्यानुसार मद्यपी वाहनचालकांकडून पाचपट जास्त दंड वसूल केला जाणार आहे.  यानुसार दंडाची रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.

भारतातील रस्त्यांवर दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात घडतात. तर दीड लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागतात. या पार्श्वभूमीवर या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. आता हे सुधारित विधेयक लवकरच अंतिम मंजुरीसाठी संसदेत सादर केलं जाईल.

या नव्या सुधारीत कायद्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांकडूनही मोठा दंड वसूल केला जाणार आहे. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर केला नसल्यास 2500 रुपये, वाहतुकीचे नियम तोडल्यास 1000 रुपये, सीट बेल्टचा वापर केला नसल्यास 1000 रुपये, वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 5000 रुपये इतका दंड वसूल केला जाईल.