रिओ दी जेनेरिओ: भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं चीनच्या वर्ल्ड नंबर टू आणि लंडन ऑलिम्पिकची रौप्यपदकविजेती वँग यिहानचा 22-20, 21-19 असा सरळ गेम्समध्ये धुव्वा उडवला. सिंधूनं हा सामना 54 मिनिटांत जिंकला.


 

या सामन्यात वँग यिहाननं सिंधूला कडवी टक्कर दिली. पण सिंधूनं वेळोवेळी वँग यिहानचं आव्हान मोडून काढलं. त्यामुळं आता सिंधू ऑलिम्पिकपदकापासून केवळ एक विजय दूर आहे. सिंधूसमोर आता उपांत्य फेरीत जपानच्या नोझोमी ओकूहाराचं आव्हान असून हा सामना 18 ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजून 50 मिनिटांनी खेळवला जाईल.

 

दरम्यान, पी. व्ही. सिंधू ही ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठणारी दुसरीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरलीय. याआधी सायना नेहवालनं 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठून कांस्यपदकाची कमाई केली होती.

 

(AP Photo/Vincent Thian)

 

उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात सिंधूनं आपलं सर्वस्व पणाला लावलं. सिंधूच्या आक्रमक आणि बचावात्मक खेळापुढं वँग यिहान अगदीच निरुत्तर ठरली. बॅडमिंटनमध्ये चिनी खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळतो. पण सिंधूनं वँग यिहानला घरचा रस्ता दाखवून चीनची भिंत भेदण्याचा पराक्रम गाजवला.

 

सिंधूसमोर वँग यिहानचे ड्रॉप्स आणि स्मॅशेस परतवून लावण्याचं मोठं आव्हान होतं आणि सिंधूनही ते आव्हान अगदी लिलया पेललं. या सामन्यात पहिल्या गेममध्ये वँग यिहाननं 11-8 अशी तीन गुणांची आघाडी घेतली होती. पण सिंधूनं जबरदस्त कमबॅक करुन पहिला गेम 22-20 असा जिंकला. तर दुसऱ्या गेममध्ये सिंधूकडे 18-13 अशी आघाडी होती. पण त्यानंतर सिंधूनं वँगला सलग सहा गुणांची खिरापत वाटली. त्यामुळं वँग दुसरा गेम जिंकेल असं वाटत होतं. मात्र सिंधूनं सलग तीन गुणांची वसूली करुन वँग यिहानचं आव्हान 21-19 असं मोडून काढलं.

 

सिंधूसमोर आता उपांत्य फेरीत जपानच्या सहाव्या मानांकित नोझोमी ओकुहाराचं आव्हान असेल. जर सिंधूनं नोझोमी ओकुहाराला हरवलं तर यंदाच्या ऑलिम्पिकमधलं भारताचं पहिलं पदक निश्चित होईल.