प्रो कब्बडी: पुणे-दिल्लीत थरारक खेळ, सामना बरोबरीत सुटला
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2016 02:47 AM (IST)
मुंबई: प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली संघांमधला सामना हा 27-27 असा बरोबरीत सुटला. यंदाच्या मोसमात बरोबरीत सुटलेला हा पहिलाच सामना आहे. उभय संघांमधला हा सामना अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत रंगला. या सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत दबंग दिल्लीकडे 27-26 अशी एका गुणाची आघाडी होती. पण दिल्लीच्या मेराज शेखची अखेरची चढाई ही डू ऑर डाय रेड होती. त्यामुळं मेराजला कोणत्याही परिस्थितीत एक गुण आणणं गरजेचं होतं. पण पुण्याच्या खेळाडूंनी मेराजची जबदरस्त पकड करुन सामन्यात 27-27 अशी बरोबरी साधली. पुण्याकडून मनजीत चिल्लर आणि दीपक हुडानं प्रत्येकी सात गुणांची कमाई केली. तर दबंग दिल्लीसाठी काशिलिंग आडके, सचिन शिंगाडे आणि दीपक नरवालनं प्रत्येकी पाच गुण वसूल केले.